तीव्र मेंदूज्‍वर

 
तीव्र मेंदूज्‍वर


 

रोगप्रसारक घटक

तीव्र मेंदूदाह लक्षणे समूह (ए.ई.एस.) यामध्‍ये विविध आजारांच्‍या लक्षणाचा अंतर्भाव होतो. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने जपानीज मेंदूज्‍वर, चंडीपूरा, मेंदूज्‍वर, इत्‍यादी आजार आहेत. वैद्यकियदृष्‍टया विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी जंतू स्‍पायरोसिस काही रसायनी तत्‍वे इत्‍यादी घटकांमुळे मज्‍जा संस्‍थेवर होणा-या परिणामांच्‍या आजारांच्‍या लक्षणांचा समूह आहे. ऋतुमानाप्रमाणे व भौगोलिक क्षेञानुसार वाहक घटकांच्‍या परिणामामध्‍ये भिन्‍नता असते.काही विषाणूजन्‍य मेंदूदाहमध्‍ये आजाराची तीव्रता व मृत्‍यूचे प्रमाण अतिशय जास्‍त असू शकते. विशेषतः जपानीज मेंदूदाह व एन्‍टेरोव्‍हॉयरस मेंदूदाह यामध्‍ये भारताच्‍या काही भागात मृत्‍यूचे प्रमाण अधिक आहे.

आजाराची ठळक वैशिष्ट्ये

हा रोग केंद्रीय मज्‍जा संस्‍थेवर परिणाम करतो. मृत्‍यूचे प्रमाण या रोगात फार जास्‍त आहे. जे रुग्‍ण वाचतात त्‍या रुग्‍णांमध्‍ये मज्‍जसंस्‍थ्‍ेावर दुष्‍परिणाम होतात. लहान मुलांमध्‍ये नैसर्गिकरित्‍या रोग प्रतिकारक शक्‍ती कमी असल्‍यामुळे या रोगाची बाधा लहान मुलांमध्‍ये जास्‍त प्रमाणात आहे. रुग्‍णाचे अपंगत्‍व, मृत्‍यू इत्‍यादी कमी करण्‍याकरीता चांगले वैद्यकिय व्‍यवस्‍थापन आवश्‍यक आहे आजाराची तीव्रता व होणारे परिणाम हे विशिष्ट विषाणू, रुग्‍णांची प्रतिकारशक्‍ती व वातावरणातील विविध घटक इत्‍यादीवर अवलंबून आहे.

वातावरणातील घटक

जपानीज मेंदूज्वर उद्रेक प्रामुख्‍याने मान्‍सून दरम्‍यान किंवा मान्‍सून नंतरच्‍या काळात उद्भवतात. या वेळी डासांची घनता वाढलेली असते परंतू इतर विषाणूमुळे झालेले मेंदूदाह जसे ऍन्‍टेरोव्‍हॉयरसेस मेंदूदाह हे जलजन्‍य असल्‍यामुळे त्‍यापासून होणारे मेंदूदाह वर्षभर आढळून येतात.

प्रसाराची पध्‍दत

आजाराचा प्रसार हा विषाणूच्‍या प्रकारावर अवलंबून आहे.

अधिशयन काळ

अधिशयन कालावधी हा वेगवेगळया आजारामध्‍ये वेगवेगळा आहे.

रोगाची लक्षणे व चिन्‍हे

ए.ई.एस आजार समूहामध्‍ये तापाची तीव्रता कमी अधिक प्रमाणात असते. रुग्‍णामध्ये मज्‍जारज्‍जूशी संबधित लक्षणे आढळतात.

  • डोकेदुखी,
  • ताप,
  • बेशुध्‍द अवस्‍था
  • संभ्रम अवस्‍था,
  • अचेतन अवस्‍था,
  • हातापायाचा थरकाप,
  • संपूर्ण शरीर लुळे पडणे.
  • शारिरीक हालचालींमध्ये ताळमेळ नसणे इत्‍यादी

निदान

या आजाराचे निदान खालील प्रयोगशाळा चाचण्‍याव्‍दारे करण्‍यात येते.

  • पी.सी.आर व्‍दारे विषाणूंच्‍या आर.एन.ए.चे परिक्षण.
  • आय.जी.एम. एन्‍टीबॉडीची चाचणी.
  • विषाणूचे अलगीकरण

उपचार

या आजारांवर निश्चित असा कोणताही उपचार नाही परंतु रुग्णाच्या लक्षणांनुसार वेळेत केलेला उपचार मोलाचा ठरतो. आजारातून ब-या झालेल्या पण अपंगत्व आलेल्या रुग्णाचे पुनर्वसन हा उपचाराचा महत्वाचा भाग आहे.

प्रतिबंधात्‍मक उपाययोजना

आजाराच्‍या प्रकारानुसार प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात येतात.

  • जे.ई., मेंदूज्‍वरामध्‍ये डास नियंञण करणे.
  • चंडीपुरा, मेंदूज्‍वरामध्‍ये – सॅन्‍डफलाय नियंञण करणे.

आरोग्‍य शिक्षण संदेश

  • परिसर स्‍वच्‍छता ठेवणे.
  • वैयक्तिक सुरक्षा करणे.
  • मच्‍छरदाणीचा वापर करणे.
  • किटक प्रतिरोधक साधनांचा वापर इत्‍यादी.