संपर्क महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
भारत सरकार

इतर सेवा

सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा

महाराष्ट्र शासनाच्या त्रिस्तरीय पद्धतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एक यानुसार ३० सार्वजनिक प्रयोगशाळांचे जाळे आहे. ( ठाणे जिल्ह्यात एक खुद्द ठाणे येथे व एक कोंकण भवन नवी मुंबई येथे सार्वजनिक प्रयोगशाळा आहे. ) पुण्यातील प्रयोगशाळा ही राज्यस्तरिय प्रयोगशाळा असून शीर्षस्थ प्रयोगशाळा आहे. नागपूर व औरंगाबाद यथील प्रयोगशाळा या प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाशीम, हिंगोली, नंदुरबार व गोंदिया ह्या जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबतचा शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला आहे

राज्य रक्त संक्रमण परिषद

परिचय / ध्येय / उद्देश
महाराष्ट्रामध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेची स्थापना दि ४ जानेवारी १९९६ च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या दि २ व ४ जुलै १९९६ च्या शासकीय आदेशानुसार करण्यात आली आहे. ही परिषद एक संस्था म्हणून १८६०च्या अधिनियमानुसार संस्थांच्या निबंधकांकडे २२ जानेवारी १९९७ रोजी व त्यानंतर मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५० अंतर्गत न्यास म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे दि १७ फेब्रुवारी १९९८ प्रमाणे नोंदण्यात आली आहे.
वाजवी शुल्कामध्ये रक्त व रक्त घटकांची उपलब्धता गरजू लाभर्थ्यांना करून देणे हा परिषदेचा मुख्य हेतू आहे.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील १४ प्रतीनिधीच्या नियामक परिषदेकडे परिषदेच्या व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव हे या परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. आरोग्य सेवा संचालक हे परिषदेचे संचालक असून परिषदेच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्यांना सहायक संचालक आरोग्य सेवा ( रक्त संक्रमण ) यांचेकडून साहाय्य केले जाते.

परिचर्या विभाग

आरोग्य सेवा संचालनालयाचा परिचर्या विभाग हा परिचर्या प्रशिक्षण विद्यालये व राज्य परिचर्या महाविद्यालये यांच्या स्थापनेसाठी कार्यरत आहे. प्रादेशिक उपसंचालकांना परिचारिका संवर्ग व  जिल्हा परिषदेत एएनएम व एलएचव्ही यांच्या सरळसेवा पदभरती बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना हा विभाग मार्गदर्शन करतो.

परिवहन

आरग्य सेवा ही महत्वाची व आपत्कालीन सेवा आहे. राज्यभरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध स्तरावर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करीत आहेत. महाराष्ट्रातील लोकांना चांगली व तातडीची वैद्यकीय मदत व सेवा पुरविणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे ध्येय आहे. कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थाना वाहनांची गरज असते, तसेच डॉक्टर्स, परिचारिका, औषधे व वैद्यकीय उपकरणांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची गरज असते. कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यावर परिणामकारक पर्यवेक्षणाची व समयोचित परिवहनाची गरज असते. जर वाहतुकीची सुविधा व वाहने असतील तरच राज्यभरातील आरोग्य कार्यक्रमांचे परिणामकारक पर्यवेक्षण शक्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका, मिनीबस, ट्रक, जीप इत्यादी वाहनाचा वापर करण्यात येतो. वाहन ही सार्वजनिक आरोग्य विभागाची जीवनरेखा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वाहनांची देखभाल करण्यासाठी सन १९६२ मध्ये राज्य आरोग्य परिवहन विभागाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आरोग्य परिवहन विभागाची कामगिरी समाधानकारक आहे.

वाहनांप्रमाणेच प्रत्येक आरोग्य संस्थेला वेगवेगळ्या रुग्णालयीन उपकरणांची आवश्यकता असते. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी राज्य आरोग्य परिवहन विभागा अंतर्गत आरोग्य उपकरणे देखभाल व दुरुस्ती विभागाची १९७२ मध्ये स्थापना करण्यात आली

माहिती शिक्षण व संपर्क

माहिती शिक्षण व संपर्क कार्ये बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकीकृत माहिती शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे १९९६ मध्ये स्थापन केला आहे.

सर्वसाधारण उद्दिष्ट :

  • आरोग्य सेवांबाबत समाजामध्ये जागृती घडवून आणणे.
  • कुटुंब कल्याण व आरोग्य कार्यक्रमामध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे .
  • आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जनतेला उद्युक्त करणे
  • आरोग्याबाबत लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणणे

विशिष्ट उद्देश :

  • राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत लोकशिक्षण देणे.
  • आरोग्य शिक्षण साहित्य निर्माण करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे
  • आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करणे
  • महिलांच्या व युवकांच्या विविध गटांसाठी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम आयोजित करणे
  • महाराष्ट्र आरोग्य पत्रिका मासिकाचे प्रकाशन करणे
  • शैक्षणिक उपक्रम व विविध माध्यमें वापरण्याच्या पद्धतीचे मूल्यमापन करणे
  • आरोग्य उपक्रमांचे व्यवस्थापन करणे
  • राज्यातील आरोग्य शिक्षण प्रकल्पांचे पुनारावलोकन करणे
  • जागतिक आरोग्य दिन, जागतिक लोकसंख्या दिन, जागतिक एड्स दिन या दिवशी सामुहिक विविध उपक्रम आयोजणे. जिल्हा स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्थानिक ग्रामपंचायतीच्या व सेवाभावी संस्थांच्या मदतीने आरोग्य प्रदर्शना सारखे कार्यक्रम आयोजित करणे
  • दूरदर्शन जाहिराती, आकाशवाणीवर चारोळी, कविता, सीडी, वर्तमानपत्रात जाहिराती देणे इत्यादी.
  • ग्रामीण भागात माता व बाल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना व आरोग्य संस्थांना डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देणे

आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी

जन्म व मृत्यू नोंदणी,व राज्याच्या ग्रामीण व शहरी विभागातील जीवनविषयक आकडेवारीचे संकलन संचालकांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाकडून केले जाते जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेले महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम २००० ची अंमलबजावणी व पर्यवेक्षण या विभागाकडून करण्यात येते. जन्म व मृत्यू नोंदणी व रुग्णालयाच्या सांख्यिकी ( संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग) याबाबत माहितीचे सादरीकरण या विभागाकडून केले जाते. संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य यांना मुख्य निबंधक जन्म व मृत्यू म्हणून व उपसंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी, महाराष्ट्र राज्य यांना उप मुख्य निबंधक जन्म व मृत्यू म्हणून निर्देशित करण्यात आले आहे.

  • आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली मधून या विभागाकडून खालील अहवाल तयार केले जातात
  • नागरी नोंदणी प्रणालीचा मासिक अहवाल
  • ग्रामीण भागातील मृत्यूच्या कारणाचे सर्वेक्षण
  • संसर्गजन्य रोग
  • लिंग प्रमाणाचे निरीक्षण
  • नागरी नोंदणी अंतर्गत गाव, व जिल्हा पातळीवरील जन्म व मृत्यू निरीक्षण समित्यांचे तिमाही अहवालांची पूर्तता करणे