लेप्टोस्पायरोसीस

 
लेप्टोस्पायरोसीस

लेप्‍टोस्‍पायरोसीस हा लेप्‍टोस्‍पायरा या रोगजंतुमुळे होणारा आजार आहे. महाराष्‍ट्रात कोकण विभागात हा आजार विशेषकरुन आढळतो. रोगबाधीत प्राणी (मुख्‍यतः उंदीर,डुक्‍कर, गाई, म्‍हशी, कुञी) यांच्‍या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्‍यांच्‍या लघवीने दुषित झालेले पाणी, माती, भाज्‍या यांचा माणसाशी संपर्क आल्‍यास हा रोग होतो.

 

आजाराचा प्रकार

पाण्याशी संबंधित आजार

आजारावर परिणाम करणारे साथरोगशास्त्रीय घटक

महाराष्‍ट्रात कोकण विभागात हा आजार विशेषकरुन आढळतो. पर्यावरणात झपाटयाने होणारे बदल रासायनीक खतांच्‍या वापराने करण्‍यात येणारी आधुनिक शेती या व अशा अनेक कारणांमुळे किनारपटटी लगतच्‍या परिसरात लेप्‍टो सारख्‍या प्राणिजन्‍य आजारांमध्‍ये वाढ होताना दिसते आहे.प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात या आजाराचे रुग्ण आढळतात. दूषित प्राण्याच्या मलमूत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत आहे.

रोग जंतु विषयक माहिती

हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूच्या 23 प्रजाती आहेत. उंदीर,घुशी तसेच अन्य पाळीव प्राणी यामुळे या आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो.

हा आजार कोणाला होतो

पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणा-या व्‍यक्‍तींना हा आजार होण्‍याची अधिक शक्‍यता असते. शेत मजुर, भातशेती करणारे लोक, कत्‍तलखान्‍यातील कामगार, मासेमार अशा व्यक्तींना या रोगाची विशेष करुन लागण होते..

परिसर घटक

लेप्‍टोस्‍पायरोसीस हा आजार विशिष्‍ट हंगामामध्‍ये आढळून येतो, प्रामुख्‍याने पावसाळयाच्‍या सुरुवातीला व पावसाळयाच्‍या शेवटी. काही प्रमाणात या आजाराचे तुरळक रुग्‍ण वर्षभरात दिसून येतात. दूषित प्राण्‍यांच्‍या मलमूञामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचे प्रमुख स्‍ञोत आहे.

रोगाचा प्रासार

संसर्ग झालेल्‍या जनावराच्‍या मूञ, रक्‍त अथवा मांसाशी प्रत्‍यक्ष संपर्क आल्‍याने या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम अथवा नाक, तोंड, डोळे यांच्‍या अभित्‍वचेमार्गे या रोगाचे जंतू मानवी शरीरामध्‍ये प्रवेश करतात.

अधिशयन कालावधी

७ ते १२ दिवस

लक्षणे

तीव्र ताप, डोकेदुखी स्‍नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे ही प्रमुख लक्षणे आहेत. मुञपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्‍यू ही ओढवतो. ब़-याच वेळा रुग्‍णांची लक्षणे किरकोळ वा समजून न येणारी असतात.

रोग निदान

रॅपीड डायग्‍नोस्‍टीक कीट अथवा एलायझा चाचणी व्‍दारे या आजाराचे निदान करता येते.

उपचार

पेनिसिलीन / डॉक्‍सीसायक्‍लीन / टेट्रासायक्लिन ही प्रतिजैवके या आजारासाठी प्रभावी आहेत.

प्रतिबंधात्‍मक उपाय

  1. दूषित पाणी, माती किंवा भाज्‍यांशी मानवी संपर्क टाळणे.
  2. दूषित पाण्‍याशी संपर्क ठेवणे, अपरिहार्य असल्‍यास रबर बुट, हात मोजे वापरावेत. कोकणात भातशेतीत काम करणा-या शेतकरी बांधवांसाठी हे महत्‍वाचे आहे.
  3. प्राण्‍यांच्‍या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नयेत, याची काळजी घेणे.
  4. उंदीर नियंञण.