हिवताप

 
हिवताप


 

रोगाचा प्रकार

किटकजन्‍य रोग

नैसर्गिक इतिहास

हिवताप हा रोग मानवी वसाहतींच्‍या काळाइतका पुरातन आहे. हिवताप हा मानवास फार पुर्वीपासून माहिती असलेल्‍या रोगांपैकी एक रोग आहे. मानवाची आणि हिवतापाची उत्‍क्रांती एकाच वेळी झाली असावी. ज्‍यामुळे लाखो वर्षापासून मानवाला या आजाराची माहिती आहे.
मोठया प्रमाणात वित्‍तहानी आणि जीवितहानी होत असल्‍याने हिवताप ही सार्वजनिक आरोग्‍याची गंभीर समस्‍या आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या वेळी देशात हिवतापाचे वार्षिक प्रमाण सुमारे ७.५ कोटी रुग्‍ण व ८ लाख मृत्‍यू एवढे होते.

रोगवाहक घटक

प्‍लाझामोडीयम प्रजातीच्‍या एकपेशीय सूक्ष्‍म परजीवी जंतूंचा संसर्ग झाल्‍याने हिवताप होतो आणि त्‍याचा प्रसार काही वि‍शिष्‍ट जातीच्‍या अॅनाफीलिस मादीमुळे होतो. भारतात आढळणा-या अॅनाफीलिसच्‍या सुमारे ५८ जातीपैकी केवळ काही हिवतापाच्‍या प्रमुख प्रसारक समजल्‍या जातात. ग्रामीण भागात अॅनॉफीलिस क्‍युलेसिफेसीस व शहरी भागात अॅनाफीलिस स्टिफेन्‍सी हे अतिशय महत्‍वाचे रोगवाहक डास आहेत. मानवाला खालील चार विविध हिवताप परजीवीमुळे हिवताप होतो.

  1. प्‍लासमोडीयम व्‍हायव्‍हॅक्‍स
  2. प्‍लासमोडीयम फॅल्‍सीपॅरम
  3. प्‍लासमोडीयम मलेरी
  4. प्‍लासमोडीयम ओव्‍हेल
जीवनचक्रः - हिवताप परजीवी २ जीवनचक्रात वाढतो. मानवी शरीरातील जीवनचक्र (अलैंगिक) आणि डासांच्‍या शरीरातील जीवनचक्र (लैंगिक) अशी ती २ जीवनचक्रे आहेत.

रोगकारक घटक

वय, लिंग, वंश, गरोदरपण, लोकांचे स्‍थलांतर, माणसांच्‍या सवयी, व्‍यवसाय इत्‍यादी घटक हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.
माणसास हिवतापाची लागण केवळ अॅनाफीलिस डासांच्‍या मादीपासून होते. हिवतापाच्‍या प्रसारास डास घनता, डासांचे आयुष्‍यमान, राहण्‍याच्‍या सवयी, अंडी घालण्‍याच्‍या सवयी, किटकनाशकास प्रतिकार इत्‍यादी बाबी कारणीभूत आहेत.

पर्यावरणीय घटक

भारताच्‍या बहुतांश भागात हिवताप हा विशिष्‍ट ऋतूत होणारा आहे. या आजारांचे जास्‍तीत जास्‍त प्रमाण जुलै ते नोव्‍हेंबर या कालावधीत आढळते. तापमान आर्द्रता पर्जन्‍यमान,सांडपाण्‍याचे नियोजन इत्‍यादी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.

रोगप्रसाराचे माध्‍यम

हिवतापाचा प्रसार काही विशिष्‍ट जातीच्‍या दूषित अॅनाफीलिस मादी चावल्‍यामुळे होतो. त्‍वचेव्‍दारे, स्‍नायुव्‍दारे आणि शिरेव्‍दारे देण्‍यात येणा-या रक्‍त अथवा प्‍लाझमामुळे अपघाताने हिवताप लादला जाऊ शकतो. दूषित मातेकडून नवजात अर्भकास जन्‍मजात हिवताप होऊ शकतो.

अधिशयन काळ

परजीवीच्‍या प्रजातीनुसार अधिशयन काळात बदल होतो. सर्वसाधारणपणे परजीवीचा शरीरात शिरकाव झाल्‍यापासून सुमारे १४ ते १५ दिवसात रोगांची प्राथमिक वैदयकिय चिन्‍हे व लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे व चिन्‍हे

  • सामान्‍यतः हिवताप आजारात थंड अवस्‍था, उष्‍ण अवस्‍था आणि घाम येण्‍याची अवस्‍था या तीन अवस्था असतात. या अवस्‍थानंतर लक्षण विरहीत अवस्‍था असून त्‍यामध्‍ये रुग्‍णाला आराम वाटू लागतो.
  • थंड अवस्‍थाः-
    या अवस्‍थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्‍यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्‍वरेने वाढत जातो, तीव्र स्‍वरुपाची डोकेदुखी आणि उलटया होणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात.
  • उष्‍ण अवस्‍थाः-
    या अवस्‍थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्‍वचेस स्‍पर्श केल्‍यास त्‍वचा गरम व कोरडी भासते. मात्र् उलटया नाहीशा होतात.
  • घाम येण्‍याची अवस्‍थाः-
    भरपूर घाम येऊन ताप कमी होतो. तापमान त्व रेने कमी होऊन त्वाचा थंड आणि घामेजते

निदान

हिवतापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्‍तनमून्‍यांची सूक्ष्‍मदर्शक यंत्राव्‍दारे तपासणी करुन किंवा अॅन्‍टीजेन युक्‍त आर.डी.के.चा वापर करुन केले जाते. सर्वसाधारणपणे रक्‍तनमून्‍यांतील हिवताप परजीवी शोधण्‍यासाठी सूक्ष्‍मदर्शक यंत्राव्‍दारे तपासणी करण्‍याची पध्‍दत वापरली जाते.

औषधोपचार

गुंतागुंत नसलेल्‍या हिवतापाचा औषधोपचारः- केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय किटकजन्‍य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित औषधोपचार धोरण - २०१० पी.व्‍हायव्‍हॅक्‍स रुग्‍णांस वयोगटानुसार दयावयाचा औषधोपचार तक्‍ता.

वयोगट (वर्ष) क्‍लोरोक्विन गोळया (१५० मि.ग्रॅ बेस) प्रायमाक्विन गोळया (२.५ मि.ग्रॅ. बेस)
पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस पहिला ते चौदा दिवस दररोज
१ वर्षाखालील १/२ गोळी १/२ गोळी १/४ गोळी निरंक
१ - ४ १ गोळी १ गोळी १/२ गोळी १ गोळी
५ - ८ २ गोळया २ गोळया १ गोळी २ गोळया
९ – १४ ३ गोळया ३ गोळया ११/२ गोळी ४ गोळया
१५ वर्षावरील ४(६०० मि.ग्रॅ) गोळया ४(६०० मि.ग्रॅ) गोळया २(३०० मि.ग्रॅ) गोळया ६(१५ मि.ग्रॅ.)
टिपः- गर्भवती माता, १ वर्षाखालील बालक आणि G6 PD -Deficiency असणा-या रुग्‍णांना प्रायमाक्विन देऊ नये.

प्रायमाक्विन १४ दिवसांचा उपचार पर्यवेक्षणाखाली करावा. पी. फॅल्‍सीपॅरम रुग्‍णांस वयोगटानुसार दयावयाचा औषधोपचार तक्‍ता.

(B) पी- फॅल्‍सीपॅरम (pf) रुग्‍णासाठी वयोगटानुसार औषधोपचार
वयोगट (वर्ष) पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आर्टीसुनेट (५० मि.ग्रॅ.)
आर्टीसुनेट (५० मि.ग्रॅ.) एस.पी (५००+२५ मि.ग्रॅ.) आर्टीसुनेट (५० मि.ग्रॅ.) प्रायमाक्विन गोळया ७.५ मि.ग्रॅ. बेस)
एक वर्षाखालील १/२ गोळया १/४ गोळया १/२ गोळया निरंक १/२ गोळया
१ – ४ १ गोळी १ गोळी १ गोळी १ गोळी १ गोळी
५ – ८ २ गोळया १ १/२ गोळी २ गोळया २ गोळया २ गोळया
९ – १४ ३ गोळया २ गोळया ३ गोळया ४ गोळया ३ गोळया
१५ वर्षावरील ४ (२०० मि.ग्रॅ.) ३ (१.५ मि.ग्रॅ.+७५ मि.ग्रॅ) ४ (२०० मि.ग्रॅ.) ६(४५मि.ग्रॅ.) ४ ( २०० मि.ग्रॅ.)
एस. पी (SP) - ACT पॅकचा वापर करताना त्‍यामधील आर्टीसुनेट व एस.पी ची मात्रा तपासून पाहावी. कारण उपलब्‍ध एसीटी पॅकमध्‍ये आर्टीसुनेट व एसपी चे प्रमाण वेगवेगळे असू शकते.
हिवतापाचे औषधोपचार धोरण या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे. (www.nvbdcp.gov.in)

प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजना

औषधोपचार, डासांवर नियंत्रण आणि डासांच्‍या चावण्‍यापासून बचाव करणे ही हिवताप रोखण्याची त्रिसुत्री आहे.

  • लवकर निदान तत्‍पर उपचार.
  • रोगवाहक डासांवर नियंत्रण
  • रासायनिक नियंत्रण
  • जीवशास्‍त्रीय नियंत्रण
  • वैयक्तिक सुरक्षेचे उपाय
  • जनतेचा सहभाग
  • पर्यावरण व्‍यवस्‍थापन आणि डासोत्‍पत्‍ती स्‍थाने कमी करण्‍याचे उपाय

आरोग्‍य शिक्षण संदेश

हिवतापाचा प्रादुर्भाव यशस्‍वीरित्‍या कमी करण्‍यासाठी नियंत्रणात्‍मक उपाययोजनांचे बाबत जनतेत जागृती निर्माण करणे व वाढविणेसाठी धोरण ठरविणे. हिवतापाचे निदान त्‍वरीत ओळखल्‍यास या रोगाने होणारे मृत्‍यू टाळता येऊ शकतात. साचलेल्‍या पाणी साठयाबाबत घ्‍यावयाची खबरदारी, उदा. पाण्‍याच्‍या साठ्यांमध्‍ये गप्‍पीमासे सोडल्‍याने डासांकरीता आदर्श अशा डासोत्‍पत्‍ती स्‍थानांत डासोत्पत्त्‍ती रोखली गेल्‍याने हिवतापाचा प्रसार आणि पर्यायाने जोखीम कमी करण्‍यास मदत होते.