महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर येथे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहे) व तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये १७२ प्रयोगशाळांचे भक्कम जाळे विस्तारलेले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चार स्तरावर आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे ही राज्याची मुख्य व संदर्भीय प्रयोगशाळा म्हणून राज्यस्तरावर कार्यरत आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर ही प्रादेशिक स्तरावर, जिल्हा स्तरावर ३१ जिल्हा मुख्यालयी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्द्यमाने दिनांक दि. १ मे २०१३ पासून आजपर्यंत ग्रामीण / उपजिल्हा रूग्णालयात १३७ उपविभागीय प्रयोगशाळा उपविभागीय स्तरावर कार्यरत आहेत. फिल्ड टेस्ट या सोप्या चाचणीव्दारे पाण्याची अणुजीवीय तपासणीसाठी ३३७ लघुप्रयोगशाळा ग्रामीण स्तरावर कार्यरत आहेत, त्यातील १३८ लघु प्रयोगशाळांचे श्रेणीवर्धन करून उपविभागीय प्रयोगशाळा म्हणून कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी अन्न भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ व अधिनियम १९५५ अंतर्गत न्यायप्रविष्ट अन्न नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस शासन निर्णय क्र. पी.१३०११/३४-७६ पीएचएएनपी (आय), दि. ०८/०२/१९७८ नुसार भारतातील ४ केंद्रीय प्रयोगशाळांपैकी एक, केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, पुणे म्हणून अधिघोषित. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, अधिनियम २०११ अन्वये सदर प्रयोगशाळेस संदर्भीय अन्न प्रयोगशाळा, पुणे ही प्रयोगशाळा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेशी संलग्न प्रयोगशाळा म्हणून कार्यरत.
सदर १७२ प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे करून रासायनिक व अणुजीवीय दृष्ट्या पाणी नमुने तपासणीचे काम होते. त्यापैकी १५ अधिघोषित अन्न प्रयोगशाळांमध्ये अन्न नमुने तपासणीचे काम होते.
आरोग्य प्रयोगशाळा बाबत ठळक घटना.
- सन १९१२ मध्ये राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा स्वच्छता मंडळ प्रयोगशाळा म्हणून अस्तित्वात आली.
- सन १९६० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून सदर प्रयोगशाळेस जिल्हा संदर्भ प्रयोगशाळा म्हणून मान्यता.
- सन १९७० पासून राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये अन्न नमुने तपासणी सुरु करण्यात आली.
- सन १९७१ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रयोगशाळेला प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा म्हणून घोषित.
- सन १९७३ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा म्हणून मान्यता मिळाली.
- सन १९७५ मध्ये नगर विकास खाते व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे शिफारशीनुसार पाणी प्रदुषण मंडळ, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण व तपास केंद्र तसेच सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी प्रयोगशाळा या सर्व प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आल्या.
- सन १९७७ पर्यंत पुढील प्रमाणे राज्यात पुणे प्रयोगशाळेसह एकूण ११ सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली. १. औरंगाबाद २. नागपूर ३. अमरावती ४. कोल्हापूर ५. सोलापूर ६. जळगांव ७. सांगली ८. नाशिक ९. नांदेड १०. कोकण भवन (नवी मुंबई)
- सन १९७७ मध्ये राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून पाणी व सांडपाणी विश्लेषण प्रयोगशाळा म्हणून प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार मान्यता मिळाली.
- सन १९७७ मध्येच सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधील लोकविश्लेषकांना शासकीय विश्लेषकांचा दर्जा प्राप्त.
- सन १९७८ मध्ये राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' संलग्न करण्याबाबत राज्य सरकारचे मान्यतेनंतर केंद्र शासनामार्फत अन्न नमुने तपासणीसाठी अधिसूचीत केले.
- सन १९८० ते १९९० हे पाणी व स्वच्छता दशक म्हणून घोषित करण्यात आले, या कालावधीत सन १९८४ ते १९८९ या पाच वर्षाच्या काळामध्ये राज्यातील उर्वरित १९ जिल्हयांमध्ये जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. या प्रयोगशाळांचा मुख्य उद्देश पाणी गुणवत्ता व संनियंत्रण हा होता, या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची अणुजैविक तसेच रासायनिक परिक्षण सुरु झाले.
- सन २००१ ते सन २००४ या कालावधीत राज्य शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयानुसार राज्यात सर्वत्र शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या सोप्या चाचणीद्वारे अणुजैविक तपासणीसाठी सुविधा ग्रामीण रूग्णालय स्तरावर टप्प्या टप्प्याने सुरू करून एकूण ३५१ लघुप्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली.
- सन २००६ मध्ये जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, अहमदनगर, सातारा, जालना व भंडारा येथे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अंतर्गत अन्न नमुन्यांची तपासणीसाठी मान्यता, त्यापैकी अहमदनगर व सातारा येथे तपासणी सुरू करण्यात आली.
- सन २०१२ ह्या वर्षी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले.
- राज्यामध्ये दिनांक १ मे २०१३ रोजी एकूण १३८ उपविभागीय प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली.
या सर्व प्रगतीपर टप्प्यामुळे राज्यात आरोग्य प्रयोगशाळांचे एक सर्वंकष परिपुर्ण जाळे निर्माण झाले आहे.
केंद्रिय/संदर्भीय अन्न प्रयोगशाळा
सन १९७६ मध्ये भारत सरकारने देशभरात एकूण चार केंद्रीय अन्न प्रयोगशाळा स्थापण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार केंद्रिय अन्न प्रयोगशाळा, कलकत्ता खेरीज आणखी तीन प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये गाझियाबाद, म्हैसूर व पुणे अशा एकूण चार ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' अस्तित्वात आल्या. दिनांक १ एप्रिल १९७८ पासून राज्य आरोग्य सार्वजनिक प्रयोगशाळेमध्ये केंद्रिय अन्न प्रयोगशाळा संलग्न म्हणुन राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला व केंद्र शासनाने सदर प्रयोगशाळा अधिघोषीत केली.
केंद्रिय/संदर्भीय अन्न प्रयोगशाळेमार्फत पुढीलप्रमाणे कार्य करण्यात येतात.
- न्यायालयाकडून प्राप्त न्यायप्रविष्ट अन्न नमुन्यांची तपासणी करणे.
- अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अधिनियम १९५५ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ अंतर्गत विविध अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी नवीन व सुयोग्य चाचण्या संशोधित करुन प्रमाणित करण्यास मदत करणे.
- जागतिक आरोग्य संघटना, अन्न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संशोधन संस्था, दिल्ली इत्यादि संस्थांनी वेळोवेळी हाती घेतलेल्या सर्वेक्षण प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांच्या स्थापनेचा उद्देश.
राज्यातील पिण्याच्या पाण्याची स्त्रोतांची व विविध अन्न नमुन्यांची अणुजैविक तसेच रासायनिक दृष्टया तपासणी करणे. तपासलेल्या नमुन्यांचे विहित पध्दतीने अहवाल संबंधीत संस्थांना वेळेत पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर करणे.
अन्न, पाणी व पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्या रसायनांची तपासणी खालील कायदे व मानांकानुसार केली जाते.
- अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११
- भारतीय मानके संस्था प्रमाणित विविध मानके उदा. आय.एस. १०५००:२०१२, ११६७३:१९९२, १०६५:१९८९ आणि २९९:१९८९.
- पाणी प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४.
कार्यपध्दती
- पाणी व अन्न नमुन्यांचे विश्लेषण करुन राज्यातील गाव, वस्ती व पाडयामधील शेवटच्या माणसापर्यंत शुध्द व सुरक्षित पाणी व अन्नाचा पुरवठा होण्यास मदत करणे.
विविध विभाग व त्यांच्या कार्यपध्दती.
प्रयोगशाळेत मुख्यतः तीन विभाग कार्यरत आहेत.
- अ) अणुजैविक विभाग
- ब) रासायनिक विभाग (पाणी)
- क) अन्न विभाग
प्रत्येक उपविभागाची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे -
अणुजैविक विभाग
- भारतीय मानके संस्थेच्या आय. एस. १०५००:२०१२ मानांकनानुसार पिण्याच्या पाण्याची अणुजैविक तपासणी
- जलजन्य साथरोग नियंत्रण व प्रतिबंध अंतर्गत रुग्णाच्या शौच नमुन्यांची रोगकारक जिवांणूसाठी तपासणी.
- रोगकारक जिवाणूंचे निश्चितीकरण केल्यानंतर त्या जिवाणूंची प्रतिजैविक औषधांची संवेदनशिलता तपासणी
- शासकीय, खाजगी तसेच अनौपचारिक अन्न नमुन्यांची अणुजैविक तपासणी.
- अन्न विषबाधा व इतर विषबाधा घटनेतील नमुन्यांची अणुजैविक तपासणी.
- महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या अन्न व पाणी नमुन्यांची तपासणी.
नमुना संकलन पध्दत
पाणी नमुने
पाण्याच्या परिणामकारक गुणवत्तापुर्ण विश्लेषणासाठी नमुन्यांचे पुढीलप्रमाणे संकलन करणे आवश्यक आहे.
- पाणी नमुना संकलनाचे नियोजन करुन घ्यावे.
- पाणी नमुने प्रातिनिधिक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे.
- संकलन करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची संख्या लोकसंख्येला पूरक प्रमाणात असावी.
- पाणी नमुना साधारणपणे २०० मिली लीटर क्षमता असलेल्या निर्जंतुक केलेल्या घट्ट बुचाच्या बाटलीत गोळा करण्यात यावा.
- गोळा केल्यानंतर पाणी नमुना लगेचच जवळच्या जिल्हा आरोग्य/उपविभागीय प्रयोगशाळेस पाठविण्यात यावा.
- पाणी नमुना कमीत कमी २४ तासाच्या आत प्रयोगशाळेत पोहचणे आवश्यक आहे.
- ते शक्य नसल्यास, नमुना शितसाखळीत ठेवला जाईल याची दक्षता घ्यावी.
सबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वनी क्रमांकासह यादी परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते, त्याची यादी परिशिष्ट २ मध्ये जोडण्यात आली आहे.
शौच नमुने
शौच नमुन्यांचे रोगकारक जिवाणूंसाठी परिक्षण करताना मिळणारे निष्कर्ष हे सर्वस्वी शौच नमुना संकलनाच्या पध्दतीवर अवलंबून आहेत.
- शौच नमुना संकलित करताना रुग्णाला कोणतीही प्रतीजैविक औषधांची उपाययोजना करण्याच्या आधी नमुना संकलन करणे आवश्यक आहे.
- निर्जंतुक केलेल्या कापसाच्या बोळयावर रुग्णाच्या गु्दव्दारातून शौच नमुना गोळा करावा.
- गोळा केलेला शौच नमुना तातडीने जवळच्या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्यात यावा.
- बॅसिलरी डिसेंट्रीच्या (हगवण) संशयित रुग्णाच्या शौच नमुना निर्जंतुक बाटलीत गोळा करुन ताबडतोब जवळच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्यात यावा.
- आरोग्य प्रयोगशाळेत नमुना पोहचण्यास दोन तासापेक्षा अधिक विलंब लागणार असल्यास, नमुना कॅरी ब्लेअर ट्रान्सपोर्ट मिडिया मध्ये गोळा करुन ठेवावा.
- ट्रान्सपोर्ट मिडियाचा पुरवठा करणा़-या संबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वनी क्रमांकासह यादी परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आली आहे.
मिडिया साठवणूक
ट्रान्सपोर्ट मिडिया संकलित केलेल्या शौच नमुन्यावर लेबल लावण्यात यावे, व पुढीलप्रमाणे माहिती सोबतच्या पत्रात पुढे दिल्याप्रमाणे जोडण्यात यावी.
- रुग्णाचे संपूर्ण नांव
- रुग्णाच्या आई वडिलाचे नांव
- रुग्णाचा पत्ता.
- रुग्णाचे वय व लिंग
- रुग्णात प्रथम लक्षणे दिसून आल्याचा दिनांक.
- प्राथमिक निदान व लक्षणे.
- रुग्णावर केलेल्या औषधोपचाराची संक्षिप्त माहिती.
वाहूतक
संकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्यक आहे. शक्य नसल्यास, नमुना शितसाखळीव्दारे (२० ते ८० सेंटीग्रेड ) या तापमानात जवळच्या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस पाठविण्यात यावा.
रक्त नमुने
रक्त नमुन्याचे संकलन हे तापाच्या जिवाणू परिक्षणासाठी करण्यात येते.
- विषमज्वर ज्यामुळे होतो अशा सालमोनेला टायफी व पॅराटायफी या जिवांणूंचे परिक्षण.
- शक्य तो आजाराच्या पहिल्या आठवडयातच नमुना गोळा करावा.
- संकलीत करताना रुग्णाला कोणताही प्रतीजैविक औषधोपचार करण्याच्या आधी नमुना संकलन करणे आवश्यक आहे.
- ५ मिली लिटर इतका रक्त नमुना ५० मिली लिटर बाईल ब्रॉथ या मिडियामध्ये घेण्यात यावा.
- बाईल ब्रॉथ उपलब्ध नसल्यास ५ मिली लिटर रक्त नमुना साध्या निर्जंतुक बाटलीत घेऊन नंतर सिरम वेगळे करुन रक्ताची शिल्लक गुठळी लवकरात लवकर नजीकच्या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात यावी.
- संकलित नमुन्यांची साठवणूक व वहातूक शौच नमुना वाहतूकीमाणेच करण्यात यावी.
- रक्त नमुना संकलनासाठी बाईल ब्रॉथ ट्रान्सपोर्ट मिडियाचा पुरवठा करणा़-या जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वनी क्रमांकासह यादी परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आली आहे.
अन्न विषबाधा घटनेसंदर्भातील नमुने.
अन्न विषबाधा ही दुषित अन्नातील जिवाणूमुळे व जीवांणूच्या चयापचय क्रियेतून काही विषारी पदार्थ निर्माण करतात, यामुळे सुध्दा होते. अन्न विषबाधेच्या या घटना मोठया समारंभातून जत्रा, धार्मिक कार्यक्रम अशावेळी झालेल्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे आढळून येते. घटना घडल्यानंतर पुढीलप्रमाणे नमुना घेण्यात यावा.
अन्न विषबाधा घटनेतील नमुने गाळा करण्याची पध्दत
- अन्न नमुना घटनास्थळी उपलब्ध असलेल्या स्वच्छ, कोरडया रूंद तोंडाच्या न गळणार्या बाटलीत अथवा बरणीमध्ये गोळा करावा. कोणतेही संरक्षक टाकण्यात येऊ नये.
- घनस्वरुपातील नमुना कमीत कमी २५० ग्रॅम तर द्रव स्वरुपातील नमुना २५० मिली लिटर एवढया प्रमाणात घ्यावा.
- नमुना गोळा करण्यासाठी बाटली अथवा बरणी उपलब्ध नसल्यास नव्या न वापरलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीत गोळा करावा.
- अन्न अथवा रुग्णाची उलटी, शौच नमुन्याला ताबडतोब लेबल लावण्यात यावे.
- अन्न विषबाधा घटनेच्या काळात अन्न नमुन्यांसोबतच अन्न बनविण्यासाठी वापरण्यात आलेले घटक पदार्थ व पाण्याचा नमुना घेणे आवश्यक आहे.
- गोळा केलेले नमुने लेबलसह तातडीने विहित नमुन्यात माहिती भरुन नजीकच्या अन्न नमुने तपासणा़-या प्रयोगशाळेत पाठविण्यात यावा. (विहित नमुना परिशिष्ट क मध्ये जोडण्यात आला आहे.)
वाहूतक
संकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्यक आहे. शक्य नसल्यास नमुना शितसाखळीव्दारे (२० ते ८० सेंटीग्रेड) या तापमानात जवळच्या अन्न नमुने तपासणा-या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस पाठविण्यात यावा.
शस्त्रक्रियागृह स्वॅब (ऑपरेशन थिएटर स्वॅब)
ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाचे ऑपरेशन करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण झाले आहे किंवा नाही हे परिक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्याची नमुना संकलनाची पध्दत पुढीलप्रमाणे आहे.
- नमुना घेण्यासाठी प्रयोगशाळेतून उपलब्ध रॉबर्टसन्स कूकड मीट मिडियाचा वापर करावा.
- पुढीलप्रमाणे निरनिराळया ठिकाणचे नमुने गोळा करावे.
- ऑपरेशन टेबल
- इन्स्ट्रुमेंट ट्रॉली,
- शॅडोलेस लॅम्प
- बॉईल्स अॅपरेटस
- टेबलाजवळची जमीन.
- थिएटरच्या चार भिंतीपैकी एक भिंत
- छताचा नमुना
रॉबर्टसन्स कूकड मीट मिडिया हा सध्या फक्त राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणी होत असल्यामुळे तेथेच उपलब्ध होईल.
साठवणूक व वहातूक
नमुना संकलनानंतर मिडियाची बाटली शीत साखळीचा वापर न करता सामान्य तापमानालाच ठेवावी व लवकरात लवकर नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात यावा.
ब) रासायनिक विभाग (पाणी)
विभागाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे.
- भारतीय मानके आय. एस. १०५००:२०१२ नुसार पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी करणे.
- पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया केलेले सांडपाणी यांचे प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार रासायनिक परिक्षण.
- अन्न विषबाधा घटनेसंदर्भात रासायनिक विषबाधा झाल्याचा संशय असलेल्या नमुन्यांचे किटक नाशकासारख्या व इतर विषबाधाकारक रसायनांसाठी तपासणी.
- भारतीय मानके आय. एस. (११६७३:१९९२) सोडियम हायपोक्लोराईट, विरंजक चुर्णाचे (ब्लिचींग पावडर) परिक्षण. १०६२:१९८९.
- पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणा़या अन्य रसायनाचे रासायनिक परिक्षण.
- तुरटीचे (घन व द्रव) भारतीय मानके आय. एस. (२९९:१९८९) नुसार परिक्षण.
- बांधकामासाठी वापरण्यात येणा-या पाणी नमुन्यांचे तसेच पोहण्याच्या तलावाचे पाणी परिक्षण.
- पाणी शुध्दीकरणासाठी विरंजक चुर्णाची मात्रा निश्चित करणे.
- पाण्याची रासायनिक तपासणी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध किट्सची त्यांच्या गुणवत्ता व तांत्रिक अभिप्रायासाठी तपासणी करणे.
पाणी नमुना रासायनिक तपासणी
पाणी नमुना संकलनाची पध्दत
- रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना स्वच्छ धुतलेल्या प्लॅस्टिकच्या ५ लिटरच्या कॅनमध्ये गोळा करावा.
- शक्य तो नवीन कॅनचा वापर करावा.
- तो उपलब्ध न झाल्यास वापरलेला कॅन वापरण्यास हरकत नाही. परंतु तो रॉकेल, डेटॉल, साबण या व अशा अन्य रसायनांसाठी वापरलेला नसावा.
- नमुना प्रातिनिधीक स्वरुपाचा असावा.
- स्त्रोताच्या पृष्ठभागावर तरंगणा़-या वस्तू टाळून नमुना गोळा करावा.
- ज्या स्त्रोतांचे पाणी घ्यावयाचे आहे त्या पाण्याने कॅन दोन वेळेला धुवावा.
- कमीत कमी अडीच लिटर एवढा पाणी नमुना तपासणीसाठी आवश्यक आहे.
वाहतुक
सबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वनी क्रमांकासह यादी परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते त्याची यादी परिशिष्ट २ मध्ये जोडण्यात आली आहे.
विरंजक चूर्ण (ब्लिचींग पावडर)
संकलनाची पध्दत
- विरंजक चूर्ण नमुना जास्त काळ हवेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- नमुना प्रातिनिधीक स्वरुपाचा आवश्यक असल्याने मध्य भागाचा नमुना घ्यावा.
- नमुना कोरडया व स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्यावा.
- साधारणपणे २५ ग्रॅम एवढा नमुना तपासणीसाठी आवश्यक आहे.
- नमुना घेतल्यानंतर मुख्य पिशवीचे तोंड तातडीने घट्ट बंद करावे.
- विरंजक चुर्णाचा नमुना गोळा करताना त्वचा अथवा अन्य अवयवांशी संबंध येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- दुहेरी पॅकींगपध्दतीमध्ये दोन पिशव्यांच्या मध्ये पुढे सांगितल्याप्रमाणे नमुन्यांची माहिती एका चिठठीवर लिहून बंद करावी.
- नमुना गोळा केल्याची तारीख
- उत्पादनाची तारीख व वर्ष
- उत्पादकाचे नांव
- कंपनीचे नांव
- ब्रॅन्ड नेम
साठवणूक व वहातूक
नमुना संकलनानंतर नमुना प्रयोगशाळेत पाठवावा, विलंब लागणार असेल तर तो कोरडया स्वच्छ व अंधा़-या जागेत सुरक्षितपणे सामान्य तापमानालाच ठेवावा.
क) अन्न विभाग.
राज्यातील १५ अन्न विश्लेषण करणा-या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहेत.
- अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ नुसार विविध अन्न नमुन्यांची तपासणी करणे.
- विविध विशिष्ठ घटना जसे की, अन्न विषबाधा या अंतर्गत अन्न नमुन्यांची तपासणी करणे.
- महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या भेटीच्या वेळी अन्न व पाणी नमुन्यांचे संकलन व परिक्षण करणे.
- शासकीय, खाजगी व अनौपचारिक अन्न नमुन्यांचे परिक्षण करणे.
- अन्न भेसळ बाबतची माहिती प्रात्यक्षिकासह विविध अभ्यागतांना देणे.
- विविध प्रदर्शनामध्ये अन्न भेसळी बाबत सामान्य जनतेला माहिती देणे.
- तांत्रिक कर्मचा़-यांना अन्न नमुने तपासणीबाबत नवीन पध्दतीबाबत प्रशिक्षित करणे.
अन्न विषयक कायद्यांची अंमलबजावणी.
अन्न भेसळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे. याबाबींवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अस्तित्वात आणला. सुरूवातीस हा कायदा शहरी भागासाठी मुख्यत: महानगरपालिका व नगरपालिका यांच्या पुरता मर्यादित होता. नंतर ग्रामीण भागालासुध्दा अन्न भेसळीपासून सुरक्षा मिळावी यासाठी सन १९७० मध्ये कायद्याची व्याप्ती वाढविण्यात आली. यासाठी १९७० पासून कायद्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांचेकडे देण्यात आली. यासाठी राज्य शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले. नुकतेच सन २००६ मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करुन अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ हा कायदा ५ ऑगस्ट २०११ पासून अस्तित्वात आला.
अन्न सुरक्षा कायद्याचे उद्देश
- सर्वांना सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे.
- ग्राहकाचे हक्क अबाधित रहावे.
- सकस व परिपुर्ण पोषक आहाराचा पुरवठा राज्यातील सर्व लाभार्थींना मिळावा.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ याची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार विविध संस्था खालील प्रमाणे.
- अन्न सुरक्षा आयुक्त
- अन्न सुरक्षा अधिकारी
- सह आयुक्त तथा न्याय निर्णय अधिकारी
- रेल्वे विभाग यांनी नेमलेले अन्न सुरक्षा अधिकारी.
- अन्न व औषध प्रशासनामार्फत नियुक्त केलेले अन्न सुरक्षा अधिकारी.
- परवाना प्राधिकारी.
- ग्राहक मंच व संघटना.
- न्याय संस्था.
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम विभाग
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून, या कार्यक्रमांतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांकडे मीठ नमुने तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर येथे मीठ व लघवी नमुने, त्यामधील आयोडीनचे प्रमाण तपासणीसाठी प्राप्त होतात.
प्रत्येक महिन्यांचे "मासिक माहिती अहवाल" अन्न व औषध प्रशासनाकडे आणि मीठ आयुक्त, भारत सरकार यांचेकडे सादर केले जातात. केंद्राच्या व राज्याच्या आरोग्य संचालनालयातील संबंधीत कक्षाकडे ही माहिती नियमितपणे सादर केली जाते.
आयोडीनयुक्त मीठ नमुने तपासणी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी ५० मीठ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत दरमहा तपासणी होणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने दरमहा ५ मीठ नमुने (घर / दुकान / अंगणवाडी / प्राथमिक शाळा /हॉटेल /सार्वजनिक कार्यालय /खानावळ येथे) संकलित करून जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवावेत.
मीठ नमुन्यावर तापमान, आर्द्रता, पाणी, साठवणूकीचा जास्त कालावधी यांचा आयोडीन प्रमाणावर विपरीत परिणाम होत असल्याने मीठ नमुने घेताक्षणीच सिलबंद करणे आवश्यक आहे.
मीठ नमुने व्यवस्थित संकलित करून सोबत जोडलेल्या सर्व माहितीसह संबंधित जिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात यावी. मीठ नमुने घेतल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नयेत.
मिठाचे नमुने कमीत कमी १०० ग्रॅम पॅालिथिनच्या पिशवीत घेवून ताबडतोब सिलबंद करावेत व नमुन्यासोबत खालील माहिती घेण्यात यावी.
- घरमालकाचे नाव :
- पत्ता :
- मीठ नमुना आयोडीनयुक्त मीठ / साधे खडे मीठ आहे :
- मीठ खरेदी केल्याचे दिनांक (साठवण / कालावधी)
- खरेदी ठिकाण (उत्पादक कंपनी : वितरक माहिती / ब्रॅंडचे नाव उत्पादक तारीख)
नंतर दुसरी पॅालिथिनची पिशवी घेऊन मिठाच्या नमुन्याची पिशवी व वरील पूर्ण माहिती लिहिलेली चिठ्ठी त्यामध्ये टाकून पिशवी सीलबंद करावी व नमुना तपासणी करीता पाठवावा.
पिशवीवर खालील माहिती लिहावी.
- प्रा.आ. केंद्र / ग्रामिण रुग्णालयाचे नाव _________ तालुका _________ जिल्हा
- मीठ नमुना क्रमांक
- एकूण मीठ नमुने
- तपासणीस पाठविल्याची दिनांक
- जिल्हा सार्वजनिक आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत मीठ नमुने पाठवताना आवश्यक त्या तक्त्यात मीठ नमुने माहिती व्यवस्थित भरून व ती योग्य रित्या भरल्याची खात्री करून स्वाक्षरी करावी.
अ.क्र. |
नमुने पाठविणा-या संस्थेचे नाव |
नमुना कोठून घेतला ते ठिकाण, नाव व पत्ता |
मीठ उत्पादकाचे नाव व पत्ता |
ब्रॅंडचे नाव / पॅकिंग / किंमत इत्यादी |
बॅच क्रमांक / उत्पादन दिनांक |
नमुना घेतल्याचा दिनांक |
आयोडीन मिठात आयोडीनचे प्रमाण खालीलप्रमाणे अपेक्षित आहे.
- उत्पादक पातळीवर कमीत कमी ३० मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.)
- दुकानदार पातळी १५ मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.) च्यावर
लघवी नमुन्यातील आयोडीनचे प्रमाण तपासणी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून संशयित रुग्णांचे कमीत कमी २५ लघवी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.
अ.क्र. |
आरोग्य प्रयोगशाळा |
मंडळ |
1 |
राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे. |
पुणे |
2 |
प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर |
नागपूर |
प्रत्येक ग्रामिण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय / जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून दरमहा ६ लघवी नमुने पाठविण्याची जबाबदारी प्रयोगशाळा तंत्रज्ञावर राहील.
- गर्भवती माता २ लघवी नमुने
- स्तनदा माता २ लघवी नमुने
- विद्यार्थी २ लघवी नमुने.
लघवी नमुने गोळा करून खालील संपूर्ण माहितीसह प्रयोगशाळेत देण्यात यावेत.
अ.क्र. |
रुग्णांचे नाव |
लिंग |
वय |
रुग्णाचा पत्ता |
नमुना घेतल्याचा दिनांक |
नमुना तपासणीस पाठविल्याचा दिनांक |
१ |
|
|
|
|
|
|
- लघवी नमुने १०० मिलि लिटर क्षमतेच्या काचेच्या अथवा प्लॅस्टीकच्या बाटलीतून ५० ते ७० मिली लिटर नमुना पाठविण्यात यावा. सदरची बाटली स्वच्छ व रसायन मुक्त (आयोडीन फ्री) असणे गरजेचे आहे. या करिता प्रथम स्वच्छ पाण्याने व नंतर गरम डिस्टील्ड वाटरने बाटल्या स्वच्छ कराव्यात. बाटलीचे झाकण घट्ट बसत आहे व त्यातून नमुना सांडत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- लघवी नमुन्यामध्ये सल्फर विरहीत टोल्युन हा संरक्षक द्रव्य पुरेशा प्रमाणात (चार ते पाच थेंब) टाकण्यात यावा.
प्रशिक्षण विषयक कार्य
- तांत्रिक कर्मचा़-यांना सेवांतर्गत प्रशिक्षण.
- इतर राज्यातील तांत्रिक कर्मचा़-यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण.
- आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग.
- वैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.
- ग्राहक मंचाच्या सदस्यांना आंतरराज्यीय प्रशिक्षण.
- प्रदर्शनाव्दारे प्रशिक्षण.
- वैद्यकिय शाखा विद्यार्थी
- स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी / कर्मचारी
- महाविद्यालयीन विद्यार्थी
- शुश्रूषा परिचारिका
- स्वच्छता निरिक्षक
- सामान्य जनता
वैशिष्टय पूर्ण इतर कामे.
- पाणी आणि अन्न यांची गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीने सामान्य जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणे.
- प्रदर्शन सहभागातून सुरक्षित अन्न व स्वच्छ पाण्याबाबत सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे.
या सर्व तीन विभागातील कामाव्यतिरीक्त पुढील कार्यात सहभाग.
- विविध तपासण्याव्यतिरीक्त, अन्न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संघटना, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून अर्थ सहायित प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग.
- राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे ही अणुजिवीय कल्चरसाठी राज्य संदर्भ प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते.
- पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस संदर्भ प्रयोगशाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जनतेकडून अपेक्षित सहभाग.
प्रयोगशाळेकडून आयोजित केल्या जाणा-या विविध प्रदर्शनाला जनतेकडून प्रतिसाद आवश्यक आहे. जनता सापेक्ष स्वजलधारा, जलस्वराज या कार्यक्रमात जनतेकडून प्रतिसाद.
अशासकीय संस्थांचा सहभाग
सामान्य जनतेसाठी राबविल्या जाणा-या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अशासकीय संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या सर्व योजनांच्या विविध टप्प्यावर प्रभावी संनियंत्रणाव्दारे कार्यक्रमाची जनता सापेक्ष अंमलबजावणी होऊ शकते.
महत्वाचा आरोग्य संदेश - ''स्वच्छ, शुध्द, अन्न व पाणी, हीच आरोग्याची खरी जननी!''