एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प्

 

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी

केंद्र शासन पुरस्‍कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला. मार्च २०१२ मध्‍ये या प्रकल्‍पासाठी असलेले जागतिक बॅकेचे अर्थ सहाय संपुष्‍टात आले असून सध्‍या हा प्रकल्‍प पुर्णपणे केंद्र शासन पुरस्‍कृत स्‍वरुपात सुरु आहे. राज्‍यात सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या सर्व रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थांचे एकञिकरण करणे हा या महत्वाकांक्षी प्रकल्‍पाचा प्रमुख उदेश आहे. अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करुन सर्व स्‍तरावरील माहितीची देवाणघेवाण अधिक गतिमान करणे तसेच स्‍थानिक स्‍तरापासून राज्‍य स्‍तरापर्यंत रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍थेचे बळकटीकरण करुन रोग नियंञणाच्‍या उददिष्‍टास हातभार लावणे हा या प्रकल्‍पाचा आणखी एक महत्‍वपूर्ण हेतू आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचे मुख्‍यालय सहसंचालक आरोग्‍य सेवा पुणे १ येथे आहे.

प्रकल्‍पाची उद्दिष्‍टये

 1. शहरी व ग्रामीण भागात रोग सर्वेक्षण व्‍यवस्‍था अधिक बळकट करुन साथरोग उद्रेक वेळेत ओळखण्‍याची क्षमता विकसीत करणे आणि क्षेञिय पातळीवर साथरोग उद्रेक प्रतिबंध व नियंञणासाठी आवश्‍यक कृतीयोजना अंमलात आणणे.
 2. रोग निदानाची गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करणे तसेच अन्‍न व पाणी यांच्‍या गुणवत्‍तेचे नियमित संनियंञण करणे.
 3. प्रकल्‍पांतर्गत समाविष्‍ट रोगांची तपासणी व उपचार यात सुधारणा करणे.
 4. शहरी रोग सर्वेक्षण बळकटीकरण करणे.
 5. खाजगी वैद्यकीय व्‍यावसायिक, वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय संस्‍था तसेच जनतेच्‍या रोग सर्वेक्षणातील सहभागास चालना देणे.
 6. रोग सर्वेक्षण विषयक माहितीचे दळणवळण अधिक गतिमान व सुलभतेने होण्‍यासाठी गावपातळी पासून राज्‍य पातळीपर्यन्‍तच्‍या सर्व स्‍तरावर अत्‍याधुनिक माहिती तंञज्ञानाचा वापर करणे.
 7. आरोग्‍य माहिती व जीवन विषयक आकडेवारी विषयी बळकटीकरण करुन रोग सर्वेक्षण मासिक प्रगती अहवालात ठळक सुधारणा अडवून आाणणे.
 8. रोग सर्वेक्षण कार्यक्रमाशी निगडीत सर्व विभागांशी समन्‍वय साधणे.

अंमलबजावणी पध्‍दती

 • एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पांतर्गत विहीत नमुन्‍यात उद्रेकजन्‍य रोगांची साप्‍ताहिक स्थिती सर्व जिल्‍हयांकडून ई-मेलव्‍दारे राज्‍य रोग सर्वेक्षण कक्षाकडे दर मंगळवारी सादर करण्‍यात येते व ती माहिती राज्‍य रोग सर्वेक्षण पथकाकडून दर बुधवारी संकलित करुन सर्वेक्षण कक्षाकडे ई-मेलव्‍दारे पाठविण्‍यात येते.
 • प्रत्‍येक जिल्‍हयाकडून साथरोग उद्रेक साप्‍ताहिक अहवाल दर सोमवारी राज्‍य रोग सर्वेक्षण कक्षाकडे पाठविण्‍यात येतो.
 • एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचे पोर्टल स्‍थापन करण्‍यात आले असून (www.idsp.nic.in) डिसेंबर २०१० पासून सर्व अहवाल पोर्टलवर सादर करण्‍यात येत आहेत.
 • वर्तमानपञात येणा-या साथरोग विषयक बातम्‍यांचाही पाठपुरावा करण्‍यात येतो(media scanning)
 • देशभरात कोठेही उदभवलेली आरोग्‍य विषयक असामान्‍य परिस्थिती कळविण्‍यासाठी १०७५ हा राष्‍ट्रीय पातळीवरील एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचा टोल फ्री क्रमांक आहे.

प्रयोगशाळांचे बळकटीकरण

या अंतर्गत २ जिल्‍हा रुग्‍णालयांच्‍या प्रयोगशाळा व १० वैद्यकीय महाविद्यालयांच्‍या प्रयोगशाळांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.साथरोग उद्रेकाच्‍या वेळी जिल्‍हयांना प्रयोगशाळा सुविधा पुरविणे हा या प्रयोगशाळांचा प्रमुख उद्देश आहे.

संदर्भ प्रयोगशाळांचे जाळे

अ.क्र. संदर्भ प्रयोगशाळेचे नाव जोडलेले जिल्‍हे
श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
 1. धुळे
 2. नंदुरबार
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
 1. पुणे
 2. सातारा
 3. अहमदनगर
 4. रत्‍नागिरी
डॉ. वैशंपायन स्‍मृती वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
 1. सोलापूर
 2. उस्‍मानाबाद
 3. लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि.सांगली
 1. सांगली
 2. कोल्‍हापुर
 3. सिंधुदुर्ग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
 1. औरंगाबाद
 2. जालना
 3. जळगांव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
 1. नांदेड
 2. परभणी
 3. हिंगोली
७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
 1. अकोला>]
 2. अमरावती
 3. बुलढाणा
 4. वाशिम
८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
 1. नागपूर
 2. गोंदिया
 3. भंडारा
९) सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा
 1. यवतमाळ
 2. चंद्रपुर
 3. वर्धा
१०) ग्रॅट मेडिकल कॉलेज, मुंबई
 1. मुंबई
 2. ठाणे
 3. रायगड

संदर्भ प्रयोगशाळांची जबाबदारी

 • सर्व जिल्‍हयांना प्रयोगशाळा सूविधा पुरविणे.
 • आयडीएसपी अंतर्गत प्रयोगशाळा सुविधांबाबत राज्‍य समन्‍वयकाशी नियमित संपर्कात रहाणे.
 • आयडीएसपी प्रयोगशाळा अहवाल ( एल फार्म) नियमितपणे पाठविणे.
 • प्रयोगशाळा निष्‍कर्ष हे त्‍वरीत राज्‍य सर्वेक्षण अधिकारी / जिल्‍हा सर्वेक्षण अधिकारी यांना वेळेत कळविणे.

जिल्‍हा प्राधान्‍य प्रयोगशाळा

बीड व नाशिक या २ जिल्‍हयातील जिल्‍हा रुग्‍णालयातील प्रयोगशाळा जिल्‍हा प्राधान्‍य प्रयोगशाळा म्‍हणून विकसीत करण्‍यात आल्‍या आहेत.

टोल फ्री क्रमांक १०७५

हा टोल फ्री क्रमांक २४तास उपलब्‍ध असून देशातील सर्व ठिकाणाहून त्‍यावर फोन करता येतो. ही सुविधा फेब्रुवारी २००८ पासून सुरु करण्‍यात आली आहे. असामान्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण आढळल्‍यास अथवा रुग्ण संख्‍येत आकस्मिक वाढ झाल्‍यास खाजगी वैद्यकीय व्याववसायिकांनीही या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा , ही अपेक्षा आहे.

शीघ्र प्रतिसाद पथके (आर.आर.टी.)

राज्‍यातील साथरोग परिस्थितीचा प्रभावी मुकाबला करण्‍यासाठी जिल्‍हा तसेच राज्‍य स्‍तरावर शीघ्र प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या पथकामध्‍ये साथरोग तज्ञ, सूक्ष्‍मजीवशास्‍ञज्ञ, कीटकशास्‍ञज्ञ, भिषक/ बालरोगतज्ञ यांचा समावेश आहे. जिल्‍हा पातळीवर झालेल्‍या प्रत्‍येक उद्रेकाचे अन्‍वेषण या पथकामार्फत केले जाते.

एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पात वापरल्‍या जाणा-या रुग्‍ण व्‍याख्‍या

सर्वेक्षण स्‍तरानुसार या कार्यक्रमात लक्षणांवर, अनुमानांवर तसेचप्रयोगशाळा निदानावर आधारीत विविध व्‍याख्‍या वापरण्‍यात येतात.

मनुष्‍यबळ

या कार्यक्रमात राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावर सर्वेक्ष्‍ाण कक्ष कार्यरत आहेत. राज्‍य स्‍तरावर राज्‍य सर्वेक्ष्‍ाण अधिका-याच्‍या नेतृत्‍वाखाली सार्वजनिक आरोग्‍य विषयातील विशेष तज्ञाचे पथक कार्यरत आहेत. जिल्‍हास्‍तरावही जिल्‍हासर्वेक्षण अधिका-यासोबत जिल्हा साथरोग तज्ञ कार्यरत आहेत.

साथरोग उद्रेक २०१२

सन २०१२ मध्‍ये एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍पांतर्गत पोर्टलवर एकुण ४३६ साथरोग उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.

आजार निहाय साथउद्रेक

या ४३६ साथरोग उद्रेकांपैकी सर्वाधिक १२७ उद्रेक डेंगी तापाचे असून त्‍या खालोखाल अतिसार व इतर तापाचे प्रत्‍येकी ८३ उद्रेक नोंदविण्‍यात आले आहेत.