क्षयरोग

 
क्षयरोग

क्षयरोग हा मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस नावाच्‍या जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. तो मुख्‍यत्‍वे करुन फुफुसाचा आजार आहे. शरीराच्‍या इतर अवयावांनाही तो होवू शकतो उदा. मज्‍यासंस्‍था, रक्‍ताभिसरण संस्‍था, त्‍वचा, हाडे इ.

 

क्षयरोगाचा नैसर्गिक इतिहास

क्षयरोगाचा रुग्‍ण जेंव्‍हा खोकतो, शिंकतो त्‍यावेळी क्षयरोगाचे जंतु वातावरणात पसरतात. श्‍वासावाटे ते निरोगी माणसाच्‍या शरीरात प्रवेश करतात. प्रवेश केल्‍यानंतर सर्वच माणसांना क्षयरोग होईल, असे नाही. ज्‍यांची प्रतिकारशक्‍ती कमी आहे, अशा माणसांना नंतर क्षयरोगची लक्षणे दिसतात. एक क्षयरोगी वर्षभरात १० ते १५ माणसांना हा आजार पसरवू शकतो. आजार होण्‍यासाठी अनेक घटक कारणीभुत आहेत उदा. दाटीवाटीने राहणारी माणसे,बंद खोल्‍या, कुपोषण, प्रतिकारशक्‍ती कमी असणे, इतर काही मोठे आजार (एडस) इत्‍यादि. हा प्रसार थांबविण्‍यासाठी क्षयरोग्‍याला लवकरात लवकर उपचाराखाली आणणे हा उपाय आहे.

रोग होण्याची प्रक्रिया (पॅथोजनेसिस)

ज्‍यावेळेस क्षयरोगाचा जीवाणु श्‍वासावाटे फुफुसात प्रवेश करतो, तेथे त्‍यांची संख्‍या वाढते. नंतर काही दिवसांनी त्‍या व्‍यक्‍तीला क्षयरोगाची लक्षणे दिसायला लागतात. याला आपण फुफुसाचा क्षयरोग म्‍हणतो. फुफुसातुन काही रुग्‍णांमध्‍ये या जीवाणुंचा प्रसार शरीराच्‍या इतर भागात उदा. मेंदु, मुत्र् पिंड, हाडे, त्‍वचा इ. ठिकाणी होवून हा आजार तिकडे पसरु शकतो. लहान मुले व एचआयव्‍हीग्रस्‍त रुग्‍ण यामध्‍ये हा क्षयरोग गंभीर स्‍वरुप धारण करतो व त्‍याला मिलीयरी क्षयरोग म्‍हणतात.

जिवाणु

क्षयरोगाचे जिवाणु दोन प्रकारचे आहेत. एक प्रकाराचे जिवाणु माणसांमध्‍ये आजाराला कारणीभूत आहेत व दुस़या प्रकारचे जनावरांमध्‍ये. माणसांमधील जिवाणुचे चार प्रकार आहेत.

 • फोटोक्रोमोजेन
 • स्‍कोटोक्रोमोजेन
 • नॅानफोटोक्रोमोजेन
 • रॅपिड ग्रोवर्स
जिवाणुचा स्‍त्रोत -

क्षयरोगाचा सांसर्गिक रुग्‍ण ज्‍याने पूर्ण उपचार घेतला नाही हा या जिवाणुचा स्‍त्रोत आहे. असा रुग्‍ण आपल्‍या थुंकीवाटे हे जिवाणु वातावरणात सोडतो. कधी कधी क्षयरोग असलेल्‍या जनावराचे दुध न उकळता पिल्‍याने हा आजार होऊ शकतो पण त्‍याचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे.

सांसर्गिकता -

जोपर्यंत रुग्‍णाला उपचार मिळत नाही तोपर्यंत तो रुग्‍ण सांसर्गिक असतो. उपचार सुरु केल्‍यानंतर तो रुग्‍ण थोडयाच अवधित असांसर्गिकहोतो.

होस्‍ट घटक

 • वय - क्षयरोग कोणत्‍याही वयाच्‍या व्‍यक्‍तीला होऊ शकतो.
 • लिंग –पुरुषांमध्‍ये जास्‍त प्रमाणात आढळतो.
 • अनुवंशिकता – क्षयरोग हा अनुवंशिक आजार नाही.
 • कुपोषण – कुपोषित व्‍यक्‍तीमध्‍ये क्षयरोग होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते.
 • प्रतिकारशक्‍ती –कमी प्रतिकार शक्‍ती असलेल्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये क्षयरोग होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. जीवाणुचा नैसर्तिक संसर्ग झाल्‍याने, व्‍यक्‍तीमध्‍ये या आजारा विरोधी प्रतिकारशक्‍ती निर्माण होते. बीसीजी लस दिल्‍याने देखील प्रतिकारशक्‍ती निर्माण होते.

वातावणाचे घटक

 • दाटीवाटीने राहणे
 • वातावरणातील प्रदुषण
 • कुपोषण
 • औदयोगिकरण

प्रसार कसा होतो

क्षयरोगाचा सांसर्गिक रुग्‍ण आपल्‍या खोकण्‍याद्वारे व थुंकीद्वारे क्षयरोगाचे जीवाणु बाहेर टाकतो. हे जीवाणु हवेमध्‍ये पसरतात. वातावरणात काही काळ ते जिवंत राहतात. असे जीवाणु निरोगी माणसाच्‍या शरीरात श्‍वासावाटे प्रवेश करतात. क्षयरोगाचे जीवाणु रुग्‍णाचे कपडे, भांडी व इतर वस्‍तुंमुळे पसरत नाही.

अधिशयनकाळ

क्षयरागाचा अधिशयनकाळ हा काही आठवडे, काही महिने ते काही वर्षां पर्यंत असु शकतो.

क्षयरोगाची लक्षणे आणि क्षयरोगाचे निदान

क्षयरोगाची सर्वसाधारण लक्षणे खालील प्रमाणे आहेत –

 • दोन आठवडे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कालावधीचा खोकला
 • खोकताना थुंकीवाटे रक्‍त पडणे
 • ताप येणे विशेषतः रात्री
 • भुक कमी लागणे
 • क्षयरोगाची इतर लक्षणे शरीराच्‍या ज्‍या भागाचा क्षयरोग असेल त्‍याप्रमाणे वेगळी वेगळी असु शकतात.

क्षयरोगाचे निदान
 • संशयीत, दोन आठवडयापेक्षा जास्‍त दिवस खोकला असणा-या व्‍यक्‍तीची थुंकी सुक्ष्‍मदर्शक यंत्राखाली तपासुन या आजाराचे निदान करता येते.
 • काही रुग्‍णांमध्‍ये क्ष किरण तपासणी, प्रयोगशाळेत कल्‍चर तपासणी व इतर अधुनिक चाचण्‍यांद्वारे करता येते.
 • परंतु थुंकी तपासणी ही सोपी, सरळ, स्‍वस्‍त, सर्वत्र् उपलब्‍ध असणारी, खात्रीची व सर्वत्र् वापरण्‍यात येणारी पध्‍दती आहे.

उपचार

क्षयरोगाचा उपचार सुधारीत राष्‍ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्‍यक्‍तींना रुग्‍णनिहाय औषधी पॅकमध्‍ये उपलब्‍ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा वेग- वेगळया कॅटेगॅरीत उपलब्‍ध आहेत. त्‍यासाठी tbcindia.nic.in या वेब साईटवर अधिक माहिती उपलब्‍ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा या कार्यक्रमांतर्गत आरोग्‍य कार्यकर्त्‍याच्‍या समक्ष देखरेखेखाली दिला जातो. त्‍याला डॉट उपचार पध्‍दती म्‍हणतात.

प्रतिबंधक उपाय योजना

 • बीसीजी लसीकरण
 • संशयीत रुग्‍णाचे लवकरात लवकर निदान करणे
 • रुग्‍णाला पुर्ण उपचार देणे
 • आरोग्‍य शिक्षण देणे